Sunday 4 March 2012

वळीव

    काही गोष्टी लिहायला म्हणून बसलं, की लक्षात यायला लागतं की ह्या जशा वाटल्या होत्या त्याहून वेगळ्याच आहेत. वाटल्या तेवढ्या कठीण नाहीयेत किंवा वाटल्या होत्या तेवढ्या सोप्याही नाहियेत. किंवा अजून काही, अनडिफायनेबल...

    आपल्या दोघांचं नातं हे सर्वार्थानी तिसर्‍याच कॅटेगरीमध्ये मोडणारं.. huh.. रादर मोडलेलं. एका डेफिनिशनमध्ये मांडता न येणारं.

    कोण होतो आपण एकमेकांचे? नातं नाही ठरवता येणार. पण बरंच काही होतो एकमेकांसाठी. स्वच्छंद धमाल करताना जिवाभावाचे मित्र-मैत्रीण, भावंडांसारखा एकमेकांना आधार देणारे, वडीलधार्‍यासारखे अधिकाराने ओरडणारे, समजावणारे, कधी नर-मादी. कळत-नकळत, आपल्या सोयीनुसार आपण आपल्या नात्याचं लेबल बदलत गेलो. रादर आपण नाहीच बदललं काही. ठरवून होणारी गोष्ट नाहीच ती. ते आपोआपच बदलतं. आपण फक्त बिनमहत्त्वाच्या, बिनगरजेच्या वाटलेल्या गोष्टींना बाजूला सारत पुढे जात राहिलो. अनोळखी प्रदेशातल्या नव्या जागा, नव्या वाटा पालथ्या घालत राहिलो. आधी थोड्या बिचकत, मग सरावाच्या झाल्यासारखे. बिनधास्तपणे. धुंदीतच एका. काही एक्स्प्रेस करून, नीट ठरवून, जरा पुढच्या वाटांचा अंदाज घेत पुढे जावं, याचं भान ठेवायचं राहूनच गेलं.

     सुरुवातीला एकमेकांची दखलही न घेणारे आपण. नंतर बाकीच्यांची दखल न घेता मोकाट सुटलेले आपण आणि आता एकमेकांना एकमेकांच्या आयुष्यातून बेदखल करायला निघालेले आपण. केवढा लांबचा पल्ला गाठला आपण! पूर्णच केलं की एक वर्तुळ.

    कसे होतो ना आपण... मॅड एकदम. क्षुल्लक निमित्त शोधून काढायचो भेटण्यासाठी. आईसक्रीम उकळायचो एकमेकांकडून. कधी नवीन चष्म्याची ट्रीट, कधी लेन्सेस करायला टाकल्याची ट्रीट, कधी विमानात फेव्हरेट हिरो बाजूला बसला होता म्हणून, कधी ऑफीसमधे कोणाला तरी उद्धटपणे फाट्यावर मारायला जमलं म्हणून, फेसबुकवर शंभराहून अधिक लाइक्स मिळाले म्हणून, कधी एकमेकांना एकमेकांच्या भाषांमधून दोन वाक्य अस्खलित बोलता आली म्हणून. ज्या वर्षीच्या वाढदिवसांना आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, त्या वर्षीच्यासुद्धा पार्ट्या घ्यायचो.. बालिश, वेडी निमित्तं.

    स्कूटरवर मागे बसायलापण किती घाबरायचीस. केवढे ते नखरे बसेस्तोवर... शेवटी "ये मग एकटी चालत, नाहीतर रिक्षेनी," असं म्हणून स्कूटर जरा पुढे नेल्यावर तुझं खास मिश्कील, वेडावून दाखवल्यासारखं हसणं फेकत बसायचीस येऊन. हा सीन नेहमीचाच. नेम केल्यासारखा. फक्त एकदा मोडला. तू सरप्रायझिंगली काहीही काचकूच न करता सहजपणे बसलीस. आपण शेवटचे भेटलेलो तेव्हाच. मी बस म्हटल्यावर लगेच बसलीस, तेव्हा मी मागे वळून "ऑ" असं केल्याचंपण आठवतंय.  आणि टू-व्हीलरची इतकी भीती असूनसुद्धा तू एकदा स्कूटर शिकायला तयार झालीस चक्क. ती एका साबणाची जाहिरात होती ना! तो तिला मागे बसून बाइक शिकवत असतो, तसंच. आवडायलाच लागली तेव्हापासून ती जाहिरात. ते आठवलं, की कितीही भिकार मूड असला ना, तरीही बारीकसं हसू येतंच चेहर्‍यावर.

    तुझं ते पर्फ्यूम! तुझं आणि त्या गोड वासाचं समीकरणच बसलंय डोक्यात फिट्ट. दुसर्‍या कोणावर सहनच नाही होऊ शकत तो वास. तुला नेहमी येणारा तो दरवळ. त्याच्याशिवाय तू अपुरीच आणि दुसरीकडे भेटला कधी तर तुझ्याशिवाय तोही अपुराच. एकदा मरीन ड्राईव्हला चालत होतो आणि बाजूने तसाच वास पास झाला. सर्रकन वळलो.  तूच आहेस की काय? नाही, ती तू नव्हतीस. पण हे कळेपर्यंतच्या दोन क्षणात आश्चर्य, आनंद, एक्साइटमेंट वगैरे उतूच गेलं फटकन.  तेव्हा लक्षात आलं, की ’अरे, हे पर्फ्यूम तर हजा़रोजणी वापरत असतील. वेडा!’ एकदा नाटकाला बसलो होतो तेव्हापण येत होता तसला वास. मराठी नाटकाला तू येणं अशक्य, (आली असतीस तर माझ्याचबरोबर, अन्यथा नाहीच), हे माहीत असूनदेखील नाही राहवलं आजूबाजूला-मागे नजर टाकल्याशिवाय. परवा एका दुकानात पर्फ्यूम घ्यायला गेलेलो. भेट म्हणून द्यायचं होतं एका बहिणीला. कसंतरीच झालं एकदम, जेव्हा दुकानदारनी नेमकं तेच धरलं नाकासमोर. दुसर्‍या बाटल्या बघतानापण मधूनमधून तीच निळी बाटली हातात घेऊन हुंगत होतो मी. बोटावर फवारून ठेवलं. पण तुझा वास दुसर्‍या कोणाला भेट म्हणून द्यायचं धाडस नाही झालं मला. वेळेबरोबर उडत जाणारा तुझा वास माझ्यात भरून ठेवण्याची केविलवाणी धडपड नंतर नाक आणि हात बराच वेळ करत होते.

   आणि तुझे डोळे! ओह, फ्रीक! परफेक्टली काळेभोर, टप्पोरे. हसणारे, चिडवणारे. चमकणारे. तू दुसर्‍या रंगाच्या लेन्सेस घ्यायच्या म्हटल्यावर केवढा इरिटेट झालेलो मी. गॉड्स गिफ्ट कळत नाही का, हे - ते, काय काय बोललो होतो. आणि "हेच ऐकायचं होतं" असे हावभाव चेहर्‍यावर आणून गंमत बघणारी तू. जसे काही तुझे डोळे हा माझा वीक पॉइंटच झालेला. आणि हे कळल्यासारखं, मला डिवचायला मुद्दाम हा विषय काढायचीस नंतर कधीतरी...

   भांडणं तर अगणित झाली ना आपली. आणि तूच सॉरी म्हणायचीस बहुदा. अबोला संपवायचीस. पडतं वगैरे घेऊन सॉरी म्हणायला मला जमायचंच नाही कधी. अगदी क्वचित. एखाद्-दुसर्‍यांदा. लाडावून ठेवलेल्या त्या इगोनी, कधी चार पावलं पुढे जाऊन नमतं घेण्याचा समजूतदारपणा दाखवूच दिला नाही मला. आणि नाही दाखवला थोडा समजूतदारपणा कधी काळी, फक्त आपलीच व्याख्या प्रमाण मानून चाललं, की खटके उडायला, समोरच्यापासून तुटायला वेळ नाहीच लागत. आपण असेच एकमेकांच्या व्याख्यांना आणि पर्यायानी स्वाभिमानाला सतत आव्हान देत राहिलो. आणि नंतर नंतर "तुझ्या मते तसं असेल.. पण मला तसं वाटत नाही.." हे सरतेशेवटी येणारं वाक्यं सुरुवातीलाच यायला लागलं. म्हणजे आपण एकमेकांच्या मतांचा आदर करून त्यांचं असणं स्वीकारत होतो असं नव्हे, तर "मला तुझ्याशी तेच तेच वांझोटे, निरर्थक वाद घालण्याची इच्छा नाही" असं. एखादाच मोठा धोका, फसवणूक, विश्वासघात असं काहीच सरळसरळ पॉइंट आउट करण्यासारखं झालंच नाही कधी आपल्यात. वापरता वापरता कापड विरत, विटत जातं तसं झालं आपलं. हळूहळू.

   आणि बाय द वे, तुझ्या एक गंमत लक्षात आल्ये का? तू चालल्येस गं निघून, पण मी होतो तिथेच असणारेय. तू जाशील तुझ्या होमटाऊनला आणि सहज फिरू शकशील गावभर. पहिल्यासारखी. पण जिथे "तू" अधिक "मी" बरोबर "आपण" झालो, त्या इथल्या जागा मला मात्र छळत राहतील आता आयुष्यभर. भकास, रिकाम्या होऊन. पण तिथे गेल्यावर आपल्या दोघांना त्या ठिकाणी इमॅजिन करण्याचा खेळ मी टाळीन बरं का निग्रहाने!

  पण जाता जाता माझी ही एक विनंती आहे. हे असं सारखं मागे वळून बघणं बंद कर प्लीज़.

"जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा

कुरेदते हो जो, अब राख जुस्तजू क्या है?"

गालिब सगळंच म्हणून बसलाय. आपण त्याच्याच ओळी वापरून तेच पुन्हा म्हणायचं. मनाला शब्दबद्ध करताना, मोकळं करताना, गालिबची निर्मिती उसनी घेण्याची अपरिहार्यता कशी टाळणार?

तर हे मागे वळून पाहणं थांबव. माझ्या बुद्धीचं मनाला समजावण्याचं काम जवळ जवळ पूर्ण होत आलंय. मी समजावलंय मनाला, की हा खेळ आता संपला आहे. पुन्हा चालू न होण्यासाठी. नव्याने डाव मांडायची ऊर्जा नाही आता. आपणही आवरतं घेऊन पुढची वाट चालायला हवी वगैरे.

आणि तेव्हाच जर आपल्या खेळगड्यानी पुन्हा मागे फिरून बघितलं, तर तेव्हा बुद्धीनी घेतलेली सगळी मेहनत पाण्यात जायला लागते. बुद्धीला कळत असतं, की हा अवेळी पडणारा पाऊस आहे. नंतर अजून भयंकर उकाडा वाढवणारा. फक्त तात्पुरती वातावरण-निर्मिती करणारा. पण तो क्षणाचा मृद्गंधपण मनाला परत मोर व्हायला निमित्त ठरतोच. पुन्हा पिसारा फुलवायचा आणि पुन्हा उघडं पडायचं. तेव्हा बुद्धीला येतो, तो हताशपणा. का सोडलं, मनाला इतकं मोकळं? का नाही केला त्याचा दगड? कीव येते स्वतःचीच.

आता खर्‍याखुर्‍या पावसाची पण भीतीच... कळायचं तरी कसं, कोणता खरा, कोणता तात्पुरता? 

"तू परत माझा मोर करू शकत नाहीस" ही समजूतच माझ्या इगोला सुख देतेय. राहू दे ना ती अबाधित. मनाला काय जातंय उगाच झुरायला वगैरे. भरल्या पोटचे धंदे सगळे. दोन वेळचं अन्न, कपडा-लत्ता, डोक्यावर सुरक्षित छप्पर हे आणि बाकीचं सगळं मूलभूत आपसूक, सुखासुखी मिळालंय, मिळतंय, त्याचाच माज म्हणून आलेली बायप्रॉडक्ट्स आहेत ही सो़कॉल्ड दु:ख-बि:ख, असं मी स्वत:ला नीट समजावलंय आता. आता भ्रम नकोत मोडायला...

आता काहीही कर तू. माझ्याभोवती एक आवरण तयार झालंय. झालंय म्हणजे मीच केलंय ते. त्यामुळे आता तू माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीस. शब्दानी नाही, गंधानीही नाही, स्पर्शानीही नाही आणि नुसत्या आठवणीनीही वेड लावणार्‍या तुझ्या त्या काळ्याभोर डोळ्यांच्या नजरेनेही नाहीच...

नाही ना?

- ३ मार्च, २०१२