Tuesday 9 April 2019

थारी बिकट नगरिया...

परवाच्या रविवारी किशोरी आमोणकरांवरच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. बघता-बघता, ऐकता-ऐकता डोक्यात काही विचार आले, काही प्रश्न पडले.

खरंतर आमोणकरांच्या गाण्याबद्दल काही भाष्य करावं, इतकी माझी पात्रताच नाही. ताईंचं (मला खरंतर त्यांना 'ताई' असं संबोधायची सवय नाही, पण आजूबाजूचे बहुतांश लोक तसंच म्हणतात, शिवाय टायपिंगचे कष्टही जरा कमी होतात, म्हणून माझ्यासाठीपण ह्या स्फुटापुरत्यातरी त्या 'ताई'च) गाणं बेहद्द आवडतं; ते ऐकताना हरवून, हरखून जायला होतं; शांत वाटतं; असं म्हणावं नि चूप बसावं, इतकीच खरंतर माझी सांगीतिक लायकी! त्यामुळे हे सर्व लिहावं, की लिहू नये असा संभ्रम होताच.
पण हे काही त्यांच्या सांगीतिक केपेबिलिटीजवरचं भाष्य नाही, त्याबद्दलचं क्रिटीसिज़म नाही, हे सॉर्ट ऑफ़ लाऊड थिंकिंग आहे, त्यामुळे हे उघडपणे लिहिणं हे काही पाप नाही, असं स्वतःला समजावून शेवटी लिहायला घेतलंच.
शिवाय हे स्फुट चुकूनमाकून एखाद्या संगीततज्ञ, विद्वान, जाणकार माणसाच्या हाती पडावं, आणि त्यांनी माझ्या ह्या शंकांचं निरसन करावं, माझे समज-गैरसमज सुधारावे, हाही एक स्वप्नरंजनात्मक विचार होताच लिहिण्यामागे.

ताईंच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल जे उल्लेख त्या मुलाखतींत आले, त्यावरुन हे प्रश्न पडायला सुरुवात झाली खरंतर.

ताई शिकवताना रागाचं नाव सांगत नसत. दॅट्स ऑलराईट! पण आरोह-अवरोहसुद्धा नाही? वादी-संवादी नाही? नुसती वातावरणनिर्मिती केली जाई, आणि शिष्य त्यातून शिकत म्हणे.

वातावरणनिर्मिती वगैरे सगळं ठीकच आहे, बरोबरच आहे, जमलंच पाहिजे, पण ती शेवटची पायरी असणार नाही का? आधी त्या रागाची चौकट आखून नाही द्यायची? व्याकरणाची पायरी पहिली. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे ते व्याकरण सांभाळत तो राग फुलवणं. आणि फुलवताना त्या रागाची वातावरणनिर्मिती करणं त्यानंतरचं पण अत्यंतिक महत्त्वाचं. हे सगळं ह्या किंवा तत्सम क्रमानी गुरूनी शिकवणं अभिप्रेत नाही का?

ताईंच्या सान्निध्यात, त्यांच्यासमोर बसून शिकताना, गाताना, ताईंनी निर्माण केलेलं/शिकवताना निर्माण होत असलेलं, त्या रागाचं वातावरण कदाचित शिष्याला तेव्हा गाईड करेल. एखादा अनाहूत सूर शिष्याला आपसूक जाणवेल. पण त्या समोर नसताना काय? त्यांच्या सूरांचा आधार नसताना काय? शिष्य जेव्हा त्याचात्याचा एकट्याने अभ्यास करेल, तेव्हा रेफ़रन्स पॉईंट्स काय घ्यायचे त्यानी? थेट रागाच्या भावविश्वाचा रेफ़रन्स हा शिष्याला अवघड नाही होत? ही मेथड खरंच वर्क होते का? ताई संगीत कोळून प्यायल्या होत्या, त्यांच्या लेव्हलला डायरेक्ट हा विचार मांडणं सोपं असेल, अनुभवसिद्ध असेल, पण शिकाऊंचं काय? काहीही क्रिप्टीक न बोलता, सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत याची उत्तरं मिळतील?

म्हणजे बघा, डोंगरमाथ्यावरून कसं सुंदर, विहंगम दृष्य दिसतं हे माहित आहे, परंतु तिथे पोहोचायचा रस्ताच माहित नाही, असं नाही का हे?
ज्याला स्वत: वर चढून ते दृष्य पाहायचंय, त्याला रस्ता माहित नसेल तर कॉन्फ़िडन्स कुठून येणार?

हे सगळे प्रश्न, हे ’शास्त्रीय’ संगीत आहे म्हणून.

रघुनंदन पणशीकरांची मैफिल छान होते. ते सोडून असे कोण कोण शिष्य आहेत ताईंचे, जे फ़क्त ताईंकडेच शिकले? (र.प. फक्त ताईंकडेच शिकले ना?) ताईंचं नाव आणखी अनेक वर्ष ’गुरु’ म्हणून लखलखतं ठेवतील असे कोण आहेत? कोण आहेत ज्यांनी एक परफ़ॉर्मर म्हणूनही लौकिकार्थाने यश मिळवलं? माझ्या डोक्यात लौकिकार्थानं यशस्वी अशी जी नावं चटकन येताहेत, ते कोणीच एक्सक्लुसिव्हली ताईंकडे शिकलेले नाहीत. आणि पणशीकर बुवांचा एक अपवाद वगळता, बाकी जी नावं आठवताहेत त्यांचं गाणं माझ्या मनाला काही केल्या रिझवत नाही. काहींचं गाणं रटाळ वाटतं, काहींचं रूक्ष. काहींचा कॉन्फ़िडन्स स्टेजवरच इतका व्हिजीबली लो असतो, की तो श्रोत्यालाही जाणवतो. मधूनच चांगले तुकडे दिसतात, पण एकंदर परफ़ॉरमन्स डागाळतोच. असं का व्हावं? हे शिकवण्याच्या पद्धतीतलं वैगुण्य म्हणायचं का?

आणि डायरेक्ट भावविश्व मेथड त्या सुरुवातीपासूनच वापरत होत्या का? की त्यांचे विचार, त्यांचं गाणं जसजसं बदलत गेलं, तसतशी शिकवण्याची पद्धतही बदलली? ताईंकडे पूर्वी शिकत असलेल्या शिष्यांपैकी कोणी यावर प्रकाश टाकला, तर किती बरं होईल! त्यांचा जुना शिष्यवर्ग ऑडियन्ससाठी तर गायबच आहे. शिकणार्‍या, शिकवणार्‍या लोकांच्या सर्कलमध्ये कदाचित वावर असेल अजूनही, पण सामान्य श्रोत्यासाठी पूरानी यादे!

ज्या ताईंनी संगीतात इतकी उंची गाठली, सूरांच्या जोरावर वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य केलं, त्यांच्या कोणत्या शिष्यांत त्यांचे नक्की कोणकोणते गुण उतरलेत?

ताई एक फ़ेनॉमेना होत्या. तसं काही पुन्हा होणं निव्वळ अशक्य आहे. तरीदेखील, शिष्यगणांपैकी कोणाची मैफ़िल असल्याचं कळलं, की मनाला तरतरी येते. त्यांच्या गाण्यातून ताईंची झलक दिसेल अशी भाबडी आशा बाळगून त्या दिवसा-वेळेची आतूरतेने वाट पाहिली जाते. कधी घोर निराशा होते, कधी कमी होते, क्वचित होत नाही.

आणि तरीही... पुन्हा कधी जाहिरात पाहिली की डोळे चमकतात, तिकीटं काढली जातात, आणि आपण अगदीच निबर, निराशावादी झालेलो नाही, हे जाणवून मनाला उगाचच तसल्ली मिळते.

- प्रथमेश नामजोशी

No comments:

Post a Comment